मुंबई बाजार समिती निवडणूक : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, नाशिक विभागातून जयदत्त होळकरांच्या उमेदवारीने निवडणुकीला ‘रंगत’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक २९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यात नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातून दोन संचालक निवडले जाणार आहे. जिल्ह्यातून या निवडणुकीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर व नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन अद्वय हिरे रिंगणात आहेत. जळगाव येथून तीन तर धुळे, नंदुरबार, अहमदनगर येथून प्रत्येकी एक उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक विभागात नाशिक, जळगाव,नगर,धुळे नंदुरबार जिल्हे असून यात ५३ कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यात ७७० शेतकरी प्रतिनिधी असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मतदान करणार आहे.नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र मधून दोन जागांसाठी आठ उमेदवार मैदानात आहेत.

राज्यात एकत्रित सत्ता मिळवलेल्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष विविध निवडणुकींमध्ये एकत्र येताना दिसताय. जिल्हा परिषद, महापालिका या निवडणुकीबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत आहेत. याची सुरुवात आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीपासून होते आहे.

या बाजार समितीच्या 25 जागांसाठी 29 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या बाजार समितीवरील राज्यातील प्रत्येक विभागातून दोन संचालकाची निवड करण्यात येते. मागील काही वर्षांपासून या बाजार समितीची निवडणूक झाली नव्हती. यामुळे ही बाजार समिती प्रशासकाच्या माध्यमातून चालविण्यात आली. यात उत्तर महाराष्ट्र मधील विविध बाजार समितीतून दोन संचालकांची निवड केली जाते.

निवडणुकीत रंगत
उत्तर महाराष्ट्रतुन नाशिक महसूल विभागात जळगाव जिल्ह्यातून तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रभाकर गोबजी पवार, सुनील दत्तात्रय पवार, किशोर भिकन पाटील यांची नावे आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यातून किशोर देवीदास पाटील, धुळे जिल्ह्यातून रितेश सुरेश पाटील, अहमदनगर जिल्ह्यातून श्रीहर्ष कैलासराव पाटील, नाशिक जिल्ह्यातून अद्वय प्रशांत हिरे, जयदत्त सीताराम होळकर यांचा समावेश आहे. यात महाविकास आघाडीकडून जयदत्त होळकर व रितेश पाटील हे उमेदवार आहेत.

नाशिक विभागात ५३ कृषी उत्पन्न बाजार समित्या
नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यात २५३ शेतकरी प्रतिनिधी संचालक आहे. अहमदनगर जिल्ह्यात १४ कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यात २१९ संचालक आहे. जळगाव येथे १२ कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यात १८० संचालक आहे. तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात १० कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यात ११८ संचालक

770 मतदार निवडणार दोन संचालक
उत्तर महाराष्ट्रतुन मुंबई बाजार समितीवर दोन संचालक निवडून जाणार आहेत. यासाठी उत्तर महाराष्ट्रतुन आठ उमेदवार रिंगणात आहे. लासलगाव बाजार समितीतचे माजी सभापती जयदत्त होळकर हे आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत उमेदवारी करीत असून त्यांच्या उमेदवारीने नाशिक विभागातील निवडणूकिला चांगलीच रंगत आली आहे.