पोलिस ठाण्यातच राडा ; ‘त्याने’ पकडली सहाय्यक निरीक्षकाची गचांडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्याने पोलीस ठाण्यातच त्याच्याविरोधात तक्रारीसाठी आलेल्या बहिणीसोबत वाद घालून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गचांडी पकडली. तसेच पोलिस ठाण्यातील प्रिंटर व संगणक खाली पाडून नुकसान केले. कोतवाली पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला. तसेच पोलीस ठाण्यातील खिडकीवर डोके आपटून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बापूसाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्‍वर रामचंद्र जाधव (रा.लिंक रोड, केडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याचे बहीण व पत्नी सोबत वाद झाले होते. त्यांना मारहाण करून पळून जाताना तो दुचाकीवरुन पडून जखमी झाला होता. पत्नी व बहिण मारहाणीची फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यात आल्या. त्यावेळी जाधव हाही पोलीस ठाण्यात आला. त्याने पोलीस ठाण्यातच बहिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मोठमोठ्याने आरडाओरडा करून माझी अगोदर फिर्याद घ्या, असे तो म्हणू लागला.

पोलीस ठाण्यातील संगणक व प्रिंटर टेबलावरून खाली टाकून नुकसान केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे सदर घटनेची माहिती घेत असताना जाधव याने त्यांची गचांडी पकडून धक्काबुक्की, शिवीगाळ केली. तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. मी आत्महत्या करतो, असे म्हणून त्याने पोलिस ठाण्यातील खिडकीवर जोरात डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी बापूसाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून जाधव याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातच सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गचांडी पकडण्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.