पंतप्रधान मोदींचा मतदानाच्या दिवशी उघड्या जीपमधून ‘रोड शो’ ; आचारसंहितेची एैशी तैशी

अहमदाबाद : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मतदानाला जाताना उघड्या जीपमधून प्रवास केला. त्यावेळी दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. मतदान झाल्यानंतर त्यांनी सुरक्षेची कोणतीही तमा न बाळगता चालत गेले. यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर मोदी मोदी असा गजर केला. मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत कोणालाही घोषणाबाजी करता येत नाही. तसेच मतदानाच्या दिवशी घोषणा देता येत नाही. परंतु, स्वत: मोदी यांनी भाजप समर्थकांना अडविले नाही. अतिउत्साही समर्थकांना कोणीही अडवून शकत नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाला जाण्यापूर्वी आपल्या आई लिलाबेन यांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते उघड्या जीपमध्ये जाऊन बसले. त्यावेळी त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंतच्या रस्त्यावर दुर्तफा मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक उभे होते. त्यासर्वांना अभिवादन करत ते मतदान केंद्रात गेले. त्यावेळी सर्वत्र मोदी मोदी असा गजर सुरु होता. एक प्रकारे मतदानाच्या दिवशी मोदी यांनी अहमदाबाद शहरातील रस्त्यावरुन प्रचाराचा रोड शो केला. त्यावेळी त्यांच्याबरोबर अमित शहा होते. अमित शहा यांच्या नातीला कडेवर घेऊन त्यांनी फोटो काढून घेतले.

‘लोकशाहीचं शस्र ‘वोटर आयडी’

त्यानंतर ते मतदान केंद्रात गेले. मतदानाचा हक्क बजावून ते बाहेर आल्यानंतर बऱ्याच अंतरापर्यंत चालत गेले. त्यावेळी मतदान केंद्राच्या १०० मीटर आतमध्येही मोठ्या प्रमाणावर समर्थक उपस्थित होते. त्यांनी मोदी मोदी असा गजर सतत चालू ठेवला होता.
काही अंतर चालत गेल्यानंतर त्यांनी टीव्ही कॅमेऱ्यांना आपली प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले की, प्रथम मतदान करणाऱ्या युवक युवतींना माझे आवाहन आहे की, त्यांनी त्यांच्या भविष्यासाठी, देशाच्या निर्णायक सरकार बनविण्यासाठी १०० टक्के मतदान करावे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. आतंकवाद्यांचा जसा आयईडी, तसा लोकतंत्रची शक्ती व्होटर आयडी आहे. आयईडी पेक्षा व्होटर आयडी जास्त बलवान ठरेल, यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांनाही तुम्ही गेले एक महिना अहोरात्र काम करीत असल्याचे सांगत त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर ते पुन्हा जीपमध्ये जाऊन बसले. जीप अतिशय संथ गतीने पुढे सरकत होती. तेव्हा दुतर्फा जमलेल्या समर्थकांनी पुन्हा मोदी मोदी याचा गजर केला. त्यांना मतदान केल्याचे बोटावरील चिन्ह दाखवत लोकांचे अभिवादन स्वीकारत हा ताफा पुढे गेला.

गेल्या वेळी २०१४ मध्ये त्यांनी मतदान करुन आल्यानंतर टीव्ही कॅमेऱ्यासमोर हातात कमळ हे चिन्ह घेऊन लोकांना मतदानाचे आवाहन केले होते. आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप तेव्हा झाला होता. पण, पुढे काहीही झाले नाही. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राहूल गांधी तसेच अटलबिहारी वाजपेयी हे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होते. परंतु, या सर्व पंतप्रधानांनी कधीही मतदानाच्या दिवशी अशाप्रकारे रोड शो करीत प्रचार करण्याचा प्रकार केला नव्हता.