राबडी देवींकडून चक्क बलात्काऱ्याचं समर्थन

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी चक्क बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असणाऱ्या आपल्याच पक्षातील आमदाराची पाठराखण केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरजेडीचा आमदार राजवल्लभ याला सरकारने या प्रकरणात फसवले आहे आणि तुरुंगात टाकले आहे. एव्हढेच नाही तर असे करून यादवांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राबडी देवी यांनी केला आहे. नवादा येथे माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मात्र खळबळ उडाली आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

यावेळी बोलताना राबडीदेवी यांनी पंप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर देखील टीका केली. आरजेडीचे आमदार राजवल्लभ अल्पवयीन बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत आहे. त्याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. विभा यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आल्या होत्या. यावेळी त्यांनी चक्क राजवल्लभ यांचीच बाजू घेतली. राजवल्लभ याला सरकारने या प्रकरणात फसवलं आणि तुरुंगात टाकलं. इतकच नाही तर असे करून यादवांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. राजवल्लभला न्यायालयाने दोषी ठरवले असताना देखील राबडी देवी यांनी त्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर भाजपाने आक्षेप घेतला आहे.