शिरूर COUNTDOWN BEGINS ; शिवसेनेचा बालेकिल्ला ‘डेंजर’ झोनमध्ये ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता महाराष्ट्रातील शेवटच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ तारखेला होणार आहे. शिरूर मतदार म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मनाला जातो. सलग तीन वेळा खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान झालेले शिवसेना नेते आढळराव पाटील आता चौथ्यांदा खासदारकीच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न उराशी घेऊन लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. पण आजचा विचार करता अमोल कोल्हे यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.

अभिनेते अमोल कोल्हे यांचे पारडे जड

‘छत्रपती संभाजी राजे’ या मालिकेतून घराघरात, सामान्य माणसांच्या मनात पोहचलेल्या अमोल कोल्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी राजकीय स्ट्रॅटेजी वापरत आढळराव पाटील यांना तगडे आव्हान दिले आहे. साहजिकच सेलिब्रेटी उमेदवारांना त्यांच्या सेलिब्रेटी असल्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्या अमोल कोल्हेंचा प्रचार जोरदार सुरु आहे. जनतेकडूनही यंदा त्यांना कौल मिळेल असे बोलले जात आहे.

अमोल कोल्हे यांची भाषणाची पद्धत आणि भाषणांमधील मुद्दे हे प्रभाव पाडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मतदार संघात चुरस होणार असे बोलले जात होते. मात्र आता मतदानाला काहीच तास शिल्लक असताना मात्र अमोल कोल्हे यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. बैलगाडा शर्यत, विमानतळाचे जनतेला दाखवलेले गाजर, आणि दुष्काळ अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी आढळराव पाटील यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे याचा फटका आढळरावांना यंदाच्या निवडणुकीत होऊ शकतो. असे सांगण्यात येत आहे.

स्थानिकांमधला जनसंपर्क आढळरावांना तारणार ?

सलग तीन वेळा आढळराव पाटील यांनी खासदारकीची हॅट्रिक केली आहे. त्यांचा स्थानिकांमध्ये मोठा जनसंपर्क आहे. स्थानिकांमध्ये वावरणारा नेता म्हणून आढळराव पाटील यांची ओळख आहे. स्थानिक लोकांमध्ये आढळरावांचा मोठा दबदबा आहे. याचाच फायदा आढळराव पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो असे मत राजकीय तज्ञांकडुन वर्तवण्यात येत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. मतदार अधिक सजग झाला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आढळरावांना सहजसजी विजय मिळवणे इतके सोपे नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.