विधानसभा 2019 : शिवाजीनगर आणि कॅन्टोंमेंटमध्ये भाजपची ‘दमछाक’ होणार, अंतर्गत ‘कलह’ मुळावर, इतर मतदार संघात ‘सुसाट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये असलेली अंतर्गत गटबाजी, पक्षांतर्गत नाराजी व त्याकडे आमदारांचे दुर्लक्ष आणि इच्छुकांची प्रचंड स्पर्धा ही कारणाने प्रामुख्याने तिकीट वाटपात महत्वाची ठरली असून लोकसभेच्या वेळी दिलेले आश्वासन पाळत भाजपाने माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे.

आमदार विजय काळे हे २०१४ मध्ये ऐनवेळचे उमेदवार होते. मोदी लाटेमध्ये ते निवडून आले होते. त्यांनी आपल्या परीने मतदारसंघाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांना जपणे, त्यांची कामे होतील, याकडे लक्ष देणे अशा गोष्टी करण्यात ते कमी पडले. त्यातून भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी वाढत गेली. त्यामुळेच यंदा त्यांना तिकीट मिळणार नाही, अशी सोशल मिडियावर हवा पसरविण्यात त्यांचे विरोधक यशस्वी झाले. त्यांनी त्याचा कधीही पुढे येऊन मुकाबला केला नाही. त्यामुळे जे येते आहे, ते खरे आहे, असाच समज मतदारसंघात पसरला. त्याचा फटका त्यांना बसला असल्याचे बोलले जात आहे.

कॅन्टोंमेंट विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार बदलणार याची चर्चा काही महिन्यांपूर्वीच जेव्हा दिलीप कांबळे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, तेव्हापासून अटकळ बांधली जात होती. शिवाजीनगर प्रमाणेच कॅन्टोंमेंट हा विधानसभा मतदार संघ म्हणजे मोदी लाटेत लागलेली लॉटरी म्हटले जात होते. आपल्या मंत्रीपदाच्या काळात दिलीप कांबळे हे मतदारसंघासाठी फारसा वेळ देऊ शकले नाही. त्यात त्यांच्यावर न्यायालयाने ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे भाजपा येथील उमेदवार बदलणार हे निश्चित होते. मात्र, भाजपाने उमेदवार बदलला तरी त्यांचाच भाऊ स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांची निवड करुन उमेदवारी घरातच राहिल याची काळजी घेतली आहे.

त्याचप्रमाणे हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही जागा शिवसेनेला सोडली जाईल असेही सांगितले जात होते. टिळेकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेले जवळीकचे संबंध यामुळेच त्यांचे तिकीट शाबूत राहिल्याचे बोलले जात आहे. आ. टिळेकरांनी मतदार संघात केलेले काम देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे.

पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ आणि खडकवासल्यात भीमराव तापकीर यांना तिसऱ्यांदा संधी मिळत आहे. वडगाव शेरीमधून विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपाने पुणे शहरातील आठही जागांवरील उमेदवार निश्चित केल्यामुळे आता शिवसेनेला पुणे शहरात एकही जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Visit : policenama.com