सुप्रिया सुळे यांच्यासमोर स्थानिक उमेदवारामुळे आव्हान वाढले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने बारामती मतदार संघातून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या रूपाने प्रथमच स्थानिक उमेदवार देत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. कुल यांच्या उमेदवारीमुळे यंदा बारामती मतदार संघातील निवडणूक चुरशीची होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दौंडचे माजी आमदार दिवंगत सुभाष कुल हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. कुल यांच्या अकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी रंजना कुल या विजयी झाल्या. 2009 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती यावेळी रमेश थोरात यांनी अपक्ष उभे राहून राहुल कुल यांचा पराभव केला होता. हा पराभव राष्ट्रवादीतीलच काही फुटीरवाद्यांमुळे झाल्याचे मत कुल गटाचे होते त्यामुळे 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत राहुल कुल यांनी भाजप राष्ट्रीय समाज पक्षाच्या युतीमध्ये रासप कडून उमेदवारी घेत थोरात यांना पराभूत केले होते. हा एक प्रकारे पवार यांच्यासाठी धक्काच होता. राहुल यांच्या पत्नी कांचन यांना उमेदवारी देत भाजपने बारामतीतून पुन्हा पवार कुटुंबासमोर आव्हान उभे केले आहे.

बारामती मतदार संघातील सहा मतदार संघांपैकी दौंड, खडकवासला आणि पुरंदर हे तीन मतदार संघ भाजप – शिवसेना युतीकडे आहेत. तर बारामती आणि इंदापूर हे दोन मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार असून भोरमध्ये मित्रपक्ष काँग्रेस चे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेस स्वतंत्र निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. इंदापूर मध्ये आघाडी शासना मध्ये मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसने धक्का दिला होता. आता आघाडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील काय भुमिका घेतात यावर सुळे यांचे मताधिक्य ठरणार आहे.भोर मध्येही काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर पवार यांनी सातत्याने कुरघोडी केली आहे. परंतु त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांनी सलग दोन निवडणुकीत स्वकरिष्म्यावर विजयश्री खेचून आणली आहे.

अगदी अलीकडे झालेल्या भोर नगरपरिषद निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार देत थोपटेना शह देण्याचा प्रयत्न केला होता. परंतू भोरकरांनी पुन्हा थोपटे यांच्यावरच विश्वास दाखविला आहे. या राजकीय कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर थोपटे हे  आघाडी धर्माचे कितपत पालन करतात यावर सुळे यांचे भवितव्य निश्चित होणार आहे.पुरंदर मधील शिवसेनेचे विद्यमान राज्यमंत्री विजय शिवतारे हे पवार यांचे कट्टर विरोधक असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कांचन कुल यांच्यामागे पुर्ण ताकद लावणार हे निश्चित आहे. तर दौंड मधून स्थानिक उमेदवार म्हणून कुल यांना पसंती मिळण्याची चिन्हे आहेत.

मागील निवडणुकीत खडकवासला या शहरी भागातून युतीचे उमेदवार महादेव जानकर यांना सुळे यांच्यापेक्षा 35 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी जानकर यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविली न्हवती, तरीही त्यांनी सुळे यांना घाम फोडला होता. 2009 भाजपने कांता नलावडे यांना उमेदवारी दिली होती. नलावडे या देखील बाहेरून दिलेल्या उमेदवार होत्या. परंतु भाजपने आता माहेर बारामती आणि सासर दौंड असलेल्या कांचन कुल या स्थानिक  महिलेला भाजपकडून उमेदवारी देत कमळा च्या चिन्हावर निवडणूक नेल्याने सुळे आणि कुल असा तुफान संघर्ष पाहायला मिळणार आहे.