टीबीमुक्त भारतासाठी प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक : डॉ. वारके

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे. टीबीमुक्त अभियानाला हातभार लावून टीबीमुक्त भारताचे स्वप्न साकार करावे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. ते कोल्हापूर जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रातर्फे आयोजित जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा क्षयरोग केंद्रातर्फे शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. यावेळी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. पी. पी. धारूरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. अनिल मडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले, क्षयरोगावर विजय मिळवण्यासाठी समाजात जनजागृती केली पाहिजे. सध्या आरोग्यासाठी समाजात भरपूर काम करण्याची गरज आहे. हे सरकारच्या सहभागाशिवाय शक्य नाही. क्षयरोगावर आपण सगळ्यांनी मिळून काम केले नाही, तर याच फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आपण पोलिओवर विजय मिळवला आहे. त्याप्रमाणे आता २०२५ मध्ये टीबीवरही विजय मिळवण्यासाठी समाजातील सर्व घटकांतील लोकांनी एकत्र आले पाहिजे.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार म्हणाल्या, जगात क्षयरोगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. देशात २८ ते ३० टक्के मृत्यू हे क्षयरोगाने होतात. क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे. यावेळी प्राचार्य डॉ. सी. जे. शिंदे, डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. विनायक भोई, डॉ. मानसी कदम, एस. एस. पुजारी, के. पी. पाटील, विनोद नायडू, एकनाथ पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.