८ वर्षाच्या चिमुकलीवर २० शल्यचिकित्सा करून वाचविले प्राण 

News abuot health

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जोगेश्वरी, मुंबई येथे राहणारी ८ वर्षीय सिमरन किचनमध्ये खेळत असताना तिच्या पायातील नायलॉनच्या पायजमाने पेट घेतला व त्यामध्ये ती ४८ टक्के भाजली होती. जोगेश्वरी येथील स्थानिक नर्सिंग होममध्ये प्राथमिक उपचार केले. मुलीचे वय लक्षात घेता तिला मीरा रोड येथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या फॅमिली केयर हॉस्पिटलमधील आयसीयुमध्ये भरती करण्यात आले. प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. प्रताप नादार यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

सीमरनच्या  भाजलेल्या जखमा या फार खोल होत्या तसेच जंतुसंसर्ग  झाल्यामुळे  तिला सेप्टिसिमीया झाला होता. फॅमिली केयर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेलया आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे तिला महागडी औषधे, नवीन रक्त चढविणे तसेच तिच्या भाजलेल्या त्वचेवर २० शल्यचिकित्सा करण्यात आल्या व आम्ही तिला कालच घरी सोडले, अशी माहिती डॉ. प्रताप नादार यांनी दिली. सिमरनवर उपचार तर सुरु होते परंतु या वैद्यकीय उपचारांसाठी १० लाखाहून अधिक खर्च अपेक्षित होता. सिमरनचे वडील हे मध्यमवर्गीय असून ते पेशाने टेम्पो ड्राइवर असल्यामुळे एवढी मोठी रक्कम जमा करणे कठीण होते. ही सर्व परिस्थिती पाहता फॅमिली केयरच्या व्यवस्थापनाने  मुलीचा जीव वाचविणे व तिला पूर्णपणे बरे करणे हे आपले प्रथम कर्तव्य मानून हॉस्पिटलचे संचालक डॉ जे बी भवानी यांनी सेवाभावी संस्था तसेच अनेक समाजातील अनेक दानशूर व्यक्तींकडे मदतीचा हात मागितला.

मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थासाठी काम करीत असलेली चाइल्ड हेल्प फाऊंडेशन तसेच अनेक व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या. ८३ दिवसाच्या डॉक्टर व आमच्या स्टाफच्या अथक प्रयत्नानी सिमरन पुढील आयुष्य आनंदात जगणार आहे यातच आमचा विजय आहे. पैशाअभावी अनेक नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा घेता येत नाहीत व अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात परंतु आम्ही केलेल्या आवाहनाला अनेक संस्थांनी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला व आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो, अशी माहिती फॅमिली केयर हॉस्पिटलचे संचालक डॉ जे. बी. भवानी यांनी दिली.