व्यवसायाच्या आमिषाने फसवणारी नायजेरियन टोळी अटकेत, सायबर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   हर्बल ऑईलचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवत अनेकांना गंडा घालत घालणाऱ्या नायजेरियन टोळीला तिघांच्या टोळीला सायबर गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यांनी शहरातील एका महिलेला 21 लाख रुपयांना फसविले आहे.

राधा नेल्सन वॅस्टन (वय ३७, रा. जुहू, मुंबई), अलेक्स अरिंझे, गुईडे फ्रान्सिस, ओकोको नवामामाह, काळू इलेचुक्यू (सर्व रा. खारघर, नवी मुंबई, मूळ-नायजेरिया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोहगाव येथील महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी या एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्या लोहगाव परिसरात राहायला आहेत. सोशल मीडियामुळे महिलेची रोज नावाच्या एका महिलेशी मैत्री झाली. ओळखीतून महिलेने हिंदुस्थानात हर्बल ऑईल विक्रीचा व्यवसाय करण्याची ऑफर दिली. ऑईल विक्रीतून ४० टक्के नफा देण्याचे आमिष तिने फिर्यादी यांना दाखविले. त्यामुळे फिर्यादी महिलेने हर्बल व्यवसायासाठी २१ लाख २३ हजार रुपये संबंधित महिलेच्या बँकखात्यात वर्ग केले. पैसे देउनही ऑईल न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्यानंतर महिलेने सायबर विभागाकडे तक्रार दिली होती.

त्यादरम्यान मुंबईहून एक महिला ऑईल विक्रीसाठी पुण्यात येणार असल्याची माहिती सायबर विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने या प्रकरणातील मुख्य आरोपी नवी मुंबईतील खारघरमध्ये असल्याची माहिती दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी खारघरमधील फर्शीपाडा गावात छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, रोकड जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी लोहगावमधील महिलेला २१ लाखांचा गंडा घातल्याची कबुली दिली.
नायजेरियन टोळीने देशभरात आणखी काही ठिकाणी फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, दीपीका मोहिते, नीतेश शेलार, बाबासाहेब कराळे, अनुप पंडित, माधुरी डोके, जमदाडे यांच्या पथकाने केली.