Pune : …तर तुम्हाला संचारबंदीचा त्रास होणार नाही – सह पोलीस आयुक्त डॉ. शिसवे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील वाढता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने शहरात कालपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र या विषयी महापालिकेच्या आदेशात पुरेशी स्पष्टता दिसत नाही. सायंकाळी 6 ते सकाळी 6 या काळात बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांनी काय करावे, तसेच पुण्यातून बाहेर जाणार्‍यांनी काय करावे. याविषयी स्पष्टता नसल्याने लोकांचा गोंधळ उडाला आहे. बाहेर गावाहून येणार्‍यांना घरी जाण्यासाठी वाहन मिळेल का, त्यांना घेण्यासाठी जर कोणी घरातून बाहेर पडले तर त्याला अडविणार का असे असंख्य प्रश्न पुणेकरांच्या मनात निर्माण झाले आहेत. दरम्यान संचारबंदीची अंमलबजावणी करताना नागरिकांना त्याचा कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये, याविषयीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. पालिकेच्या आदेशात जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत कोणाचीही अडवणूक केली जाणार नसल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

डॉ. शिसवे म्हणाले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदीचा पर्याय निवडला आहे. शनिवारी पहिल्या दिवशी बहुतांश पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. बहुतांश दुकाने, व्यापारी पेठा सायंकाळी 6 वाजण्याच्या आत बंद झाल्या. शहरातील 96 महत्वाच्या चौकात बॅरिकेट लावून नाकाबंदी सुरु केली आहे. या संचारबंदीचा उद्देश विफल करणार्‍या व विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई केली जाईल. कामावरुन घरी परतणार्‍यांची अडवणूक केली जाणार नाही. मात्र त्याने स्वत:जवळ ओळखपत्र, जेथे काम करतात त्या ठिकाणचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे. हॉटेल, रेस्ट्रॉरंट बंद असल्याने एकत्र येण्यांचे प्रमाण सायंकाळी 6 नंतर कमी असणार आहे. तातडीच्या कामासाठी लोकांना बाहेर पडायला परवानगी दिली जाणार आहे. मेट्रो, बांधकाम साईटवर अनेक असंघटीत मजूर, कामगार काम करतात. त्यांनी आपल्या कामगारांना पत्र द्यावे, असे आवाहन आम्ही केल्याचे डॉ. शिसवे म्हणाले.

सायंकाळी 6 नंतर घराबाहेर पडणार असाल तर हे जवळ बाळगा
1) अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जवळ बाळगा.
2) कामावरून घरी परतणार्‍यांनी कंपनीचे ओळखपत्र, प्रमाणपत्र जवळ बाळगावे.
3) रुग्णालयात जायचे असेल, रुग्णाला भेटायचे असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्र, डॉक्टरांचे, हॉस्पिटलचे पत्र जवळ ठेवा
4) बाहेरगावी जायचे असेल तर संबंधित गाडीचे तिकीट जवळ बाळगा.