निलेश राणेंकडून पोलिसांना अश्लील शिवीगाळ, गुन्हा दाखल

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या चेक पोस्टवर निलेश राणे यांच्या गाडीची पोलिसांकडून तपासणी केली जात असताना निलेश राणे यांनी पोलिसांना व अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे घडला.

याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी निलेश राणेसह स्वाभिमानी संघटनेच्या १६ जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी निलेश राणे यांनी पोलिसांसह शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य बाबू म्हाप यांना देखील शिवीगाळ केली व त्यांच्या अंगावर धावून गेले.

सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा धोका निर्माण झाल्याने राणेंसह इतरांना पोलिसांनी निघून जाण्याचे निर्देश दिले. मात्र त्यांनी पोलिसांचे निर्देश न जुमानता त्या ठिकाणी थांबून असभ्य वर्तन केले. त्यामुळे पोलिसांनी राणेंसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार रात्री बाराच्या सुमारास घडला असून या घटनेचे सर्व चित्रीकरण करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातीलविविध ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे.

You might also like