पतंग काढताना शॉक लागून नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – गच्चीवर अडकलेली पतंग काढताना घरावरून गेलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्याने एका ९ वर्षीय बालकाला आपले प्राण गमवावे लागल्याची सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात घडली. शॉक लागल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असताना अखेर त्याचा मृत्यू झाला.

योगेश अमृत पाटील (९, रा. शिवाजीनगर) असे बालकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार योगेश हा सकाळी ११ वाजेच्या सुमारास गच्चीवर गेला होता. गच्चीवरून गेलेली ३३००० व्होल्ट उच्च क्षमतेच्या तारेत अडकलेली पतंग काढण्याचा योगेश प्रयत्न करत असताना तारेचा एकमेकाला स्पर्श झाल्याने मोठा आवाज होत जाळ झाला. यात योगेश ८० टक्के भाजला. त्याला तत्काळ उपचारार्थ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जास्त प्रमाणात भाजल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या योगेशचा अखेर मृत्यू झाला. योगेश परिसरातील प्रगती विद्यालयात तिसरीत शिकत होता.