नीरेत मुस्लिम बांधवांनी मागितली कोरोनामुक्तीची दुवा, साधेपणाने ईद साजरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – (ता.पुरंदर) येथे मुस्लिम बांंधवांंनी करोना महामारीच्या पार्श्वभुमीवर सद्या लॉकडाऊन व संचारबंदी असल्यामुळे रमजान ईद साधेेेपणाने साजरी केली. त्याग, सदभावना आणि मनशुद्धी करणारा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद मानला जातो. ईदच्यानिमित्ताने मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देत असतात, मात्र यंदा करोना विषाणुचा संसर्ग होण्याच्या भीतीने आलिंगन देण्याचे टाळून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भ्रमणध्वनीवरच शुभेच्छा दिल्या.

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मुस्लिम बांधवांना ईदगाह मैदानावर एकत्र येऊन नमाज अदा करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे नीरा आणि परिसरातील मुस्लिम नागरिकांनी घरात नमाज अदा करून करोनाच्या संकटातून वाचविण्यासाठी अल्लाहला साकडे घातले. अल्लाहकडे सगळ्यांना आरोग्यदायी जीवन देण्याची दुआ मागितली. मुस्लिम बांधवांनी करोनाच्या महामारीच्या पार्श्वभुमीवर महिना भर रमजानच्या रोजाची इफ्तारी, रात्रीची तरावीहची विशेष नमाज घरातच अदा केली.

दरवर्षी नवनवे कपडे घालून मिरवण्याची हौस यावेळी मात्र कुठेच दिसली नाही की खरेदीसाठी बाजारात ही गर्दी केली नव्हती. एकुणच करोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवानी साधेपणाने ईद साजरी केली. अनेक मुस्लिम बांधवाशी चर्चा केल्यानंतर यंदाच्या वर्षी रमजान महिना सुरू आहे याची जाणीवच झाली नाही. इफ्तारी, तरावीहची नमाज मशिदीत झाली नसल्याने मुस्लीम बांधवाना फारसा उत्साह नसल्याची प्रतिक्रिया देण्यात आली.