निर्भया केस : सुनावणी दरम्यान ‘बेशुध्द’ झाल्या न्यायाधीश भानुमती, चेंम्बरमध्ये नेलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना स्वतंत्रपणे फाशी देण्याच्या केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर. भानुमती बेशुद्ध झाल्या. त्यानंतर तातडीने सुनावणी तहकूब करत त्यांना कक्षात हलविण्यात आले. तसेच या प्रकरणातील निर्णय नंतर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती भानुमतींच्या आरोग्याविषयी माहिती देताना सांगितले की, सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती आर.के. भानुमती यांना खूप ताप आला, अजूनही त्यांना ताप आहे. चेंबरमधील डॉक्टरांकडून त्यांची चाचणी करण्यात येत असून उपचार सुरु होता.

दरम्यान, न्यायमूर्ती भानुमती यांना शुद्ध आली असून डायसवर बसलेल्या अन्य न्यायाधीशांनी व तेथील सुप्रीम कोर्टाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना चेंबरमध्ये नेले. त्यांना व्हील चेअरवर नेण्यात आले. नंतर न्यायाधीश ए.एस. बोपन्ना म्हणाले की, आता या प्रकरणातील आदेश चेंबरमध्ये सुनावला जाईल.

You might also like