राज्यसभेत निर्भयाच्या दोषींच्या फाशीला ‘विलंब’ होत असल्याने ‘गदारोळ’, उपराष्ट्रपती नायडू म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात होत असलेल्या दिरंगाईवरून आम आदमी पार्टीने मंगळवारी राज्यसभेत आवाज उठवला. शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप केला पाहिजे, असे आपने म्हटले. सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे आणि न्यायालयाच्या आदेशाचे ताबडतोब पालन करण्यात येईल. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी म्हटले की, चारही दोषींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे, परंतु शिक्षेच्या अंमलबजावणीत उशीर होत आहे. त्यांनी म्हटले की, यावर राजकीय शेरेबाजीसुद्धा होत आहे, हे दुर्दैवी आहे.

संजय सिंह म्हणाले, 2012 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. परंतु, दोषींची फाशी सारखी-सारखी टळत आहे. तारीख पर तारीख… होत आहे. यावेळी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी सभापतींच्या आसनासमोर उभे राहून करणारे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य शांत होते. संजय सिंह यांनी म्हटले की, पीडितेला न्याय वेळेवर मिळाला पाहिजे.

सभापती म्हणाले, हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे. यावर न्यायालयाच्या आदेशाचे पालन अतिशय शीघ्रगतीने करण्यात आले पाहिजे. न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबावणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे लोक चिंतेत आणि दुखी आहेत. जे लोक व्यवस्थेमध्ये आहेत त्यांना आपले दायित्व पूर्ण केले पाहिजे. दोषींना सर्व कायदेशिर संधी दिली जाईल. आम्ही देशात असे प्रकार होऊ देणार नाही. लोकांमधील सहनशीलता कमी होऊ लागली आहे. निर्णय लवकर अंमलात आणताना दिसले पाहिजे.

सभागृहात उपस्थित केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दोषींना सजा होण्यात विलंब होत असल्याबद्दल राज्य सरकार दोषी असल्याचे म्हटले. यावर आपच्या सदस्यांनी आक्षेप घेतला.

अशी आहे घटना
16 डिसेंबर, 2012 च्या रात्री 23 वर्षीय एक पॅरामेडिकलची विद्यार्थीनी आपल्या मित्रासोबत दक्षिण दिल्लीच्या मुनिरका परिसरात बस स्टँडवर उभी होती. दोघेजण चित्रपट पाहून घरी परतण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बसची वाट पहात होते. यावेळी ते एका खासगी बसमध्ये बसले. या चालत्या बसमध्ये एका अल्पवयन मुलासह सहा लोकांनी तरूणीवर सामुहिक बलात्कार केला आणि तिला अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पीडितेला चालत्या बसमधून फेकून दिले होते. गंभीर जखमी अवस्थेत तिला चांगल्या उपचारासाठी सिंगापुरला नेण्यात आले होते. तेथे 29 डिसेंबर 2012 ला तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर पीडितेला ‘निर्भया’ हे काल्पनिक नाव देण्यात आले.

याप्रकरणी देशव्यापी आंदोलने झाली होती आणि कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली होती. या गुन्ह्यातील एका आरोपीने कारागृहातच आत्महत्या केली होती. एक अन्य दोषी अल्पवयीन होता ज्यास तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्यास अन्यत्र पाठवण्यात आले होते. उर्वरीत चार दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.