निर्भया केस : 20 मार्चला फाशी देण्याचा मार्ग ‘मोकळा’, डेथ वॉरंटला स्थगिती देण्यास कोर्टाचा स्पष्ट ‘नकार’

नवी दिल्ली : निर्भया रेप केसमध्ये 20 मार्चला दोषींना होणार्‍या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने चारही दोषींच्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने यासंदर्भात दाखल याचिका फेटाळली आहे. गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टा सुनावणीची दरम्यान हाय होल्टेज ड्रामा झाला. कोर्ट रूममध्ये दोषी अक्षय कुमारच्या पत्नीने जजच्या समोर रडण्यास सुरूवात केली. अक्षय कुमारच्या पत्नीने निर्भयाची आई आशा देवीचे पाय पकडून म्हटले की, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात ही फाशी थांबवा.

निर्भयाच्या चारही दोषींना (पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह) शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता फाशी देण्यात येणार आहे. दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने यासंदर्भात डेथ वॉरंट जारी केले आहे.

चार दोषींना वाचवण्यासाठी वकील एपी सिंह यांनी फाशीला स्थगिती देण्यासाठी दिल्लीच्या पटियाला कोर्टात याचिका केली होती. जिच्यावर गुरूवारी सुनावणी झाली. वकील एपी सिंह यांनी म्हटले की, दोषी पवन गुप्ताच्या सुधारित याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी बाकी आहे आणि दोषी अक्षय सिंहची दया याचिका प्रलंबित आहे, अशा स्थितीत डेथ वॉरंटला स्थगिती देण्यात यावी.