कोर्टाच्या बाहेर दोषी अक्षयची पत्नी झाली बेशुद्ध, ओरडून म्हणाली – ‘मला न्याय हवाय, मला सुद्धा मारा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – निर्भया गँगरेप आणि हत्या प्रकरणातील चार दोषींपैकी एक अक्षय कुमार सिंहची पत्नी गुरूवारी पटियाला हाऊस कोर्टाच्या बाहेर बेशुद्ध झाली. तिने बेशुद्ध होण्यापूर्वी म्हटले की, तिला आणि तिच्या मुलालासुद्धा फाशी देण्यात यावी. न्यायालयाच्या बाहेर ओरडत ती म्हणाली, मला न्याय हवाय. मला सुद्धा मारा. मला जगायचे नाही. माझा पती निर्दोष आहे. हा समाज त्याच्या मागे का लागला आहे?

बेभान झाली अक्षयची पत्नी

पटियाला हाऊस कोर्टाच्या बाहेर अक्षयच्या पत्नीने म्हटले की, आम्ही या आशेने जगत आहोत की आम्हाला न्याय मिळेल, परंतु मागच्या 7 वर्षांपासून आम्ही रोज मरत आहोत. सिंहच्या पत्नीने असे म्हणत स्वत:ला सँडलने मारण्यास सुरूवात केली, ज्यानंतर वकिलांनी तिला समजावले. निर्भया प्रकरणातील दोषी अक्षय सिंहच्या पत्नीने यापूर्वी बिहारच्या औरंगाबादच्या न्यायालयात पतीकडून घटस्फोट पाहिजे असल्याच्या मागणीसाठी अर्ज दाखल केला आहे. यात तिने म्हटले आहे की, अक्षयला फाशी झाल्यानंतर तिला विधवा म्हणून जगायचे नाही, यासाठी तिला घटस्फोट देण्यात यावा.

इकडे, न्यायालयाच्या बाहेर पीडितेच्या कुटुंबियांच्या वकीलाने सांगितले की, दोषींना कोणताही दिलासा मिळू नये. अक्षय आपल्या समाजाचा एक भाग आहे. अनैसर्गिक मृत्यूने प्रत्येकाला दु:ख होते, परंतु अक्षयसोबत अशी कोणतीही नरमाई बाळगली जाऊ नये.

5 मार्चला खालच्या न्यायालयाने मुकेश सिंह (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंह (31) यांना 20 मार्चला सकाळी साडेपाच वाजता फाशी देण्यासाठी नवीन डेथ वॉरंट जारी केले होते. न्यायालयाला गुरूवारी सांगण्यात आले की, सर्व दोषींनी आपल्या कायदेशीर पर्यायांचा वापर केला आहे आणि त्यांचे वाचण्याचे सर्व मार्ग जवळपास बंद झाले आहेत.

अक्षयच्या याचिकेवर निर्णय राखून ठेवला

यापूर्वी निर्भया प्रकरणात दोषी अक्षय सिंहच्या याचिकेवर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. अक्षयने आपल्या याचिकेत फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. याचिकेत अक्षयने म्हटले आहे की, त्याची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे, यासाठी फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी. याच याचिकेवर सुनावणी करत कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.

पटियाला हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांना सरकारी वकीलाने सांगितले की, दोषी अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ताच्या दुसर्‍या दया याचिकेवर सुनावणी न करता ती या आधारावर फेटाळण्यात आली की, पहिल्या दया याचिकेवर सुनावणी करण्यात आली होती आणि ती आता सुनावणी योग्य नाही.