नितीन गडकरींनी भाजपविषयी केला ‘हा’ मोठा दावा ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपविषयी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे आता त्यावर पुन्हा एकदा उलट सुलट चर्चा होत राहणार आहे. नितीन गडकरी यांनी सांगितले की, भाजप ही एक विचारधारा मानणारी पार्टी आहे. ती व्यक्ती केंद्रीत पार्टी नाही आणि तशी ती कधी होणार नाही.

भाजप हा व्यक्ती नाही तर संस्था, पक्ष मोठा असे मानून चालणारा पक्ष होता. मात्र, गेल्या ५ वर्षात तो पक्ष न राहता मोदीमय झाला आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे पक्षाने प्रमुख नेते असले व त्यांना नेता म्हणून घोषित करुन भाजपने निवडणुका लढविल्या तरी त्यांचा इतका उदोउदो पूर्वी कधी झाला नव्हता, इतका उदोउदो मोदींचा होत आहे. सध्या भाजप हा एका व्यक्तीकेंद्रीत पक्ष झाला असल्याची टिका केली जात आहे.

या टिकेला एकप्रकारे हवा देत व दुसऱ्या बाजूला पक्ष कसा होता, हे सांगताना नितीन गडकरी म्हणाले की, भाजपा हा विचारधारावर आधारित पक्ष आहे. भाजप हा मोदी केंद्रीत झाला असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. हा पक्ष कधीही केवळ अटलजींचा  नाही झाला. व कधी अडवाणीजींचाही नाही झाला. आता केवळ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांची पार्टी बनू शकत नाही.
आज लोकसभा निवडणुकीचा सर्व प्रचार हा मोदीमय झाला आहे. जर भाजपला बहुमत मिळाले नाही. तर इतरांचा पाठिंबा मिळविण्यासाठी पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते, अशी चर्चा राजधानीत सुरु झाली आहे. त्यामुळे गडकरी यांच्या या विधानाला अधिक महत्व दिले जात आहे.

यापूर्वीही गडकरी यांनी वक्तव्य करताना त्यातून मोदीविरोध सुचित होईल, अशी वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती.
नरेंद्र मोदी यांनी मी दलित जातीचा असल्याने नामदार (राहुल गांधी) माझ्यावर टिका करतात, असा आरोप केला होता. त्याचवेळी मत मागण्यासाठी जातीचा वापर करणाऱ्याचे थोबाड फोडले पाहिजे, असे गडकरी म्हणाले होते, तेव्हाही त्याची खूप चर्चा झाली होती.