एकनाथ खडसेंसारख्या निष्ठावंतावर अशी वेळ येणं दुर्देवी : नितीन गडकरी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   विधान परिषदेसाठी डावलण्यात आल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे नाराज झाल आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याचं पक्षाकडून समर्थन केलं जात असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अशी वेळ येणं हे दुर्दैवी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे हे भूखंड घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर बाजूला फेकले गेले. विधान परिषदेतून ते पुन्हा ‘कमबॅक’ करतील असे प्रत्येकाला वाटत होते. त्यांचे नाव निश्चित झाल्याचे देखील सांगण्यात येत होते. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र खडसेंना उमेदवारी न देण्याच्या पक्षाच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. खडसे यांना उमेदवारी न मिळण्यामागे अनेक कारणं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी आता मार्गदर्शक भूमिकेत रहावे असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती या प्रकरणावर आपले परखड मत मांडले आहे. खडसे यांच्यासोबत जे चाललंय ते दु:खद आणि दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि खडसे एकत्र काम केलं आहे. पक्षाचा विस्तार करण्यात खडसे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अतिशय प्रतिकूल काळात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात त्यांनी मोठं काम केलं. पक्षाला यश मिळवून दिलं. आज त्यांना दिली जाणारी वागणूक दु:खद आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून इतकी वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर किंवा नेत्यावर अशी वेळ येणं चांगलं नाही. त्याबद्दल मी फक्त दु:ख व्यक्त करू शकतो. यापेक्षा मला जास्त बोलायचे नाही, असे गडकरी यांनी म्हटले.