वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वाढीव वीजबिलांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास विरुद्ध भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. त्यानंतर आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपवर शेलक्या शब्दांत हल्ला चढवला आहे. वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार, असे म्हणत राऊत यांनी भाजपला चिमटा काढला आहे.

नितीन राऊत यांनी एक ट्विट करत म्हटलं की, “वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार! आपल्याप्रमाणे जनतेला ज्यांना वीजबिल भरायची आहेत, त्यांना ती भरू द्या! आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो हलका होऊ द्या,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

आधी वीजबिले भरा, असे सांगणाऱ्याची तक्रार करा – ऊर्जामंत्री

महावितरणचे अधिकारी आधी वीजबिले भरा, नंतर वीजबिल दुरुस्ती करून देतो, असे म्हणत असतील तर त्यांची तक्रार करा. तक्रार मिळाल्यानंतर त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण, आमचे तसे निर्देश नाहीत. काही अधिकारी, कर्मचारी जाणूनबुजून अशा पद्धतीची वागणूक देत असतील, त्यांची तक्रार महावितरणच्या वेबसाईटवर करा, असे मत राऊत यांनी माध्यमांना बोलताना व्यक्त केलं होते.

ग्राहकांकडे एकूण ५ हजार ७७६ कोटींची थकबाकी

महाराष्ट्रात टाळेबंदी काळात आलेल्या ५९ टक्के ग्राहकांनी वीजबिलांचा नियमित भरणा केलेला नाही. या ग्राहकांकडे एकूण थकबाकी ५ हजार ७७६ कोटी रुपये असून, त्यातील सुमारे साडेपाच हजार कोटींची थकबाकी टाळेबंदीच्या काळातील आहे. वीजबिले थकवण्यात मुंबईकर ग्राहकांची संख्या २५ टक्के असून, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा टक्का ६४ पेक्षा अधिक आहे. मुंबईतील अदानी, टाटा, बेस्ट या तीन कंपन्यांपैकी नियमित भरणा करण्यात बेस्टचे ग्राहक अग्रेसर आहेत.