केंद्र सरकारचा पालकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा ‘दिलासा’, ‘या’ संस्थेत ‘फि’वाढ होणार नाही

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सगळ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यातच मुलांना आयआयटी, आयआयआयटी व एनआयटीमध्ये शिवकवण्याऱ्या पालकांचं टेन्शन काहीसं वाढलं होतं. मात्र, केंद्र सरकारने अशा विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा दिला आहे. चालू शैक्षणिक वर्षात या तीनही संस्थेत फीवाढ होणार नसल्याचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

एनआयटी (NIT), आयआयटी (IIT), आयआयआयटी (IIIT) म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थामधील ज्या संस्था केंद्राच्या अनुदानावर चालतात त्यांच्या स्नातक पूर्व अभ्यासक्रमासाठी 10 टक्के शैक्षणिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्याची अंमलबजावणी या वर्षी करण्यात येणार नाही. या संस्थांच्या कुठल्याच वर्गासाठी शुल्कवाढ करु नये असा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे. ज्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था सरकारी खासगी भागिदारीत चालतात त्यांनीही शुल्क वाढ करून नये असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आयआयटी संचालकांची स्थायी समिती व आयायटी संचालक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या तीनही संस्थेत चालू शैक्षणिक 2020 -21 वर्षात फी वाढवण्यात येणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.