‘शैक्षणिक संस्थांना शुल्कवाढीची परवानगी नाहीच’ : वर्षा गायकवाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केलंय की, कोणत्याही शाळांवरची चौकशी थांबवण्यात आली नसून शैक्षणिक संस्थांना शुल्क वाढीची परवानगी नाहीच आहे. ज्या शाळांनी कोरोना काळात पालकांकडून अतिरीक्त शुल्कवसुली केली आहे अशा शाळांचे मागील 7 वर्षांचे ऑडिट करण्याचे निर्देश राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू (Omprakash Babarao Kadu) यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई विभागीय उपसंचालकांना दिले होते. संस्थाचालकांच्या अपीलावर बाजू ऐकण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी यासंबंधित बैठक बोलवली आहे. मात्र संस्थाचालकांना अभय देऊन शुल्कवाढ करण्यात येणार असा चुकीचा संदेश समाजमाध्यमात पसरवला जात असल्यानं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सदर स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे.

राज्य शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी बेकायदा शुल्क वसुली प्रकरणी सेंट जोसेफ हायस्कुल पनवेल आणि सेंट फ्रान्सिस स्कुल नाशिक या शाळांचं शैक्षणिक आणि आर्थिक ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. परंतु शाळांकडून अपील करण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडून या शाळांच्या तपासणीला स्थगिती देण्यात आली असून शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण संचालक, मंबई, नाशिक विभागाचे उपविभागीय उपसंचालक यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला त्यांना सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.

बच्चू कडू यांच्या मुंबई विभागीय शिक्षण कार्यालयाच्या मागील महिन्यातील भेटीत मुंबई परिसरातील तब्बल 20 हून अधिक बड्या शाळांच्या तक्रारी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडल्या. बच्चू कडू यांनी सांगितलं की, मुंबई विभागातील असो किंवा राज्यातील कोणतीही शाळा असो त्यांना राज्य शिक्षण विभागांचे नियम व अटी पाळणं बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर काही शाळांच्या तपासणीसाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर शाळांनी माझ्याकडं राज्य मंत्र्यांच्या विरोधात अपील केलं. या अपीलावर मंगळवारी सुनावणी ठेवली आहे. मात्र कोणत्याही प्रकारची संबंधित चौकशी थांबवली नाही असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

You might also like