‘ना खडसे – ना काकडे’ ! राज्यसभेसाठी भाजपाचं तिसरं तिकीट ‘या’ नेत्याला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपकडून राज्यभेसाठी दुसरी यादी जाहीर झाली असून यात डॉ. भगवत कराड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या मान्यतेनंतर ही यादी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, पक्षाने जाहीर केलेल्या या यादीमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. भाजपकडून एकनाथ खडसे किंवा माजी खासदार संजय काकडे या दोघांपैकी एकाला राज्यसभेत पाठवलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पक्षाने जाहीर केलेल्या यादीत या दोघांना डावलून कराड यांना संधी देण्यात आली आहे. तर विधान परिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या आधी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. ज्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनतर दुसऱ्या यादीत खडसे आणि संजय काकडे यांच्यात चुरस दिसत होती. मात्र , पक्षाने या दोघांव्यतिरिक्त डॉ. भगवत कराड यांना संधी देण्यात आली.

दुसरीकडे, महविकास आघाडीत राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल तसेच अनेक नेतेही उपस्थित होते. दरम्यान, चौथ्या जागेबाबत समन्वय समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे आज फौजिया खान यांची अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी आहे. तर शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आता राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी महाविकास आघाडीत काय परिस्थिती निर्माण होते हे पाहणे महत्वाचे आहे.

दरम्यान. राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यात एकूण सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तामिळनाडूत 6 जागा, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागांवर निवडणूक होत आहे. ओडिशा, आंध्र प्रदेशच्या चार आणि गुजरातच्या चार जागांसाठी मतदान होणार असून आसाम आणि राजस्थानमधून 3 जागा रिक्त होत आहेत.