रेल्वे भाडे आकारले जाणार नाही, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा कामगारांना दिलासा

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनचा फटका देशभरातील कामगार आणि मजूर वर्गाला बसला असून केंद्र सरकारने कामगारांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार रेल्वे विभागाने कामगारासांठी विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्याही सुरु केल्या. मात्रा, कामगारांकडून घेतल्या जाणार्‍या तिकीटांच्या पैश्यांवरुन राजकारण रंगले होते. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कामगार व मजुरांकडून रेल्वे भाडे न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

ममता बॅनर्जी यांनी ट्वीटरवरुन निर्णयाबद्दलची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी कामगार व मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे घेण्यात आल्यानंतर केंद्राने तिकीटाची 85 टक्के रक्कम रेल्वे मंत्रालय तर 15 टक्के रक्कम स्थानिक राज्य सरकार देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र काही कामगारांनी रेल्वे तिकीटाचे पैसे घेतल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. पश्चिम बंगाल सरकारने देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी 105 रेल्वे गाड्यांची सोय केली आहे.गरजेनुसार अधिक गाड्यांची सोय केली जाईल असेही बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.