‘माझ्या भविष्याची चिंता कोणी करू नये, निर्णय घेण्यास मी खंबीर’ : पंकजा मुंडे

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांच्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. मी शिवसेनेत जाणार का ? की आणखी कुठे जाणार ? अशी अफवा पसरवत माझ्याबद्दलची भविष्यवाणी काहीजण विनाकारण करत आहेत. मात्र पक्षानं मला भरपूर दिलं आहे. निर्णय घेण्यास मी खंबीर आहे असं पंकजा म्हणाल्या आहेत. इतकंच नाही तर पक्षानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय सचिवपद देऊन विश्वास टाकला आहे. तो विश्वास मी सार्थ ठरवून दाखवीन असं अभिवचनही त्यांनी यावेळी दिलं.

अंबजोगाई येथे आ नमिता मुंदडा (Namita Mundada) यांच्या वतीनं शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांच्या जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी आ. नमिता मुंदडा, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, मोहन जगताप, बाळासाहेब दोडतले, अक्षय मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

‘…म्हणून मी स्वत:च घराबाहेर निघणं टाळलं’

पंकजा मुंडे म्हणाल्या, “कोरोनाचा कालावधी असल्यानं मी मुंबईत अडकून राहिले. मी जर घराबाहेर पडले असते तर माझ्या भोवती मोठा जमाव जमा झाला असता आणि कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव वाढला असता. लोकांचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी मी स्वत:च घराबाहेर निघणं टाळलं. त्याचा मोठा गैरअर्थ करून पंकजताई घराबाहेर पडत नाहीत अशा अफवा पसरवण्यात आल्या. कोरोनाच्या काळात एकही सत्ताधारी कोविड सेंटरकडे (Covid Care Center)फिरकला नाही. अशा स्थितीत खा. डॉ प्रीतम मुंडे (Pritam Munde)व अध्यक्ष अक्षय मुंदडा प्रत्येक कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेत होते. त्यांना दिलासा देत होते.”

‘पक्षानं मला खूप काही दिलं’

पुढं बोलताना पंकजा म्हणाल्या, “माझ्याबद्दल अफवा का पसरवल्या जात आहेत हेच मला समजत नाही. आता मी शिवसेनेत जामार का कुठे जाणार ? अशा अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता करू नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षानं मला भरपूर दिलं आहे. तसंच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळं तुम्ही माझी चिंता सोडा.” असं म्हणत त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला.