महाराष्ट्रात पतंजलीच्या ‘कोरोनिल’ला बंदी !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका बसला आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असे सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना औषध शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपीठाने औषध तयार केले असून ते लाँच करण्यात आले. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनेा औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर आली होती.

हे औषध सगळ्यांसमोर आल्यानंतर काही तासांतच केंद्रीय आयुष मंत्रालयाने त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते. या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असे सांगत केंद्र सरकारनं पतंजलीला कोरोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते. सध्या केंद्र सरकार या औषधाची चाचणी करत असतानाच पतंजलीला आणखी एक धक्का बसला होता.

पतंजलीने दिलेल्या अर्जानुसार त्यांना लायसन्स देण्यात आले. पण, त्यांनी लायसन्सच्या अर्जात कुठेही करोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. विभागानं केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती. करोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे, असे परवाना अधिकार्‍यांने सांगितले होते.