कोरोनामुळं थेऊरमधील चिंतामणीच्या मंदिरात शुकशुकाट

पुणे  पोलीसनामा ऑनलाइन  – उन्हाळ्याची सुटी आणि देवदर्शन, पर्यटन हे समीकरण मागिल अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे देशभर लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच वाटा बंद झाल्या आहेत. दरम्यान, ही परिस्थिती चतुर्थीनिमित्त श्री चिंतामणीच्या मंदिरातही दिसून आली आहे. भाविकाविना मंदिरामध्ये शुकशुकाट दिसत आहे.

अष्टविनायकाच्या दर्शनासाठी चतुर्थीनिमित्त भाविकांची भल्या पहाटेपासून गर्दी होते, ती अगदी रात्री उशिरापर्यंत सुरू असते. मात्र, मागिल पावणेदोन महिन्यापासून चतुर्थीदिवशी भाविकाविना मंदिरांमध्ये गर्दी दिसत नाही. सर्वत्र सन्नाटा दिसत आहे. ही परिस्थिती पुणे शहराजवळच्या थेऊर येथील चिंतामणीच्या मंदिरामध्ये दिसून आली.

वैशाष महिन्यातील चतुर्थी असल्याने रविवारी (दि. 10 मे) सकाळी पाच वाजता कार्तिकराज आगलावे यांनी श्रींना अभिषेक केला व देवस्थानच्या वतीने सकाळी 7 वाजता पूजापाठ करण्यात आला. याप्रसंगी आनंदमहाराज तांबे व डॉ. पोफळे उपस्थित होते. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर मंदिरातच श्रींचा छबिना काढण्यात आला. प्रत्येक चतुर्थीला हजारोंच्या संख्येने भाविक थेऊर येथे श्रींच्या दर्शनसाठी येतात. मात्र, रविवारी (दि. 10) मंदिर परिसरात भक्तगण नसल्याने शुकशुकाट दिसून आला.

दरम्यान, मार्च महिन्याच्या 17 तारखेपासून देशभर लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेचपरिसरातील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तेथे जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी कोणी फिरकत नाही. थेऊर गावात लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होवो, असे भक्तांनी चिंतामणीला साकडे घातले आहे.