जेम्स बाँडने घेतला कोरानाचा ‘धसका’, No Time to Die चं प्रदर्शन ढकललं 7 महिने पुढं

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था – जगभरातील गुन्हेगारांवर वर्चस्व गाजवून जगाला भयमुक्त करणारा जेम्स बाँडने मात्र सध्या कोराना व्हायरसचा धसका घेतला आहे. जगभरात वाढत असलेल्या कोरोनाचा फैलाव लक्षात घेऊन जेम्स बाँडचा ‘नो टाइम टू डाई’ या बॉंड सिरीजमधील पुढील चित्रपटाचे प्रदर्शन चक्क ७ महिने पुढे ढकलण्यात आले आहे.

‘नो टाइम टू डाई’ हा बाँडपट येत्या २ एप्रिलला भारतासह जगभरात प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना व्हायरसमुळे लोक चित्रपटगृहात येण्याची शक्यता कमी असल्याने चित्रपटाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता हा चित्रपट युकेमध्ये १२ नोव्हेंबर तर जगभरात २५ नोव्हेंबरला प्रर्दशित होणार आहे.

डेनियल क्रैग ‘नो टाइम टू डाई’मध्ये पाचव्यांदा जेम्स बाँडची भूमिका करीत आहेत. त्याने २००६ मध्ये सर्वप्रथम कसिनो रॉयल या बाँडपटात जेम्स बाँडची भूमिका निभावली होती. त्यानंतर क्वांटम ऑफ सोलेस, स्काईफॉल आणि स्पेक्टर मध्ये त्याने भूमिका केली होती.