लघुशंकेसाठी त्यानं रस्त्याच्या कडेला पार्क केली BMW, चोरट्यांनी ‘डाव’ साधला

नोएडा : वृत्तसंस्था – रस्त्यावरील लघुशंका तुम्हाला लाखो रुपयांना पडू शकते. असाच एक अनुभव उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एक व्यक्तीला आला आहे. लघुशंका आली म्हणून त्याने रस्त्याच्या बाजूला अलिशान कार उभी केली. बीएमडब्लू कार रस्त्याच्या बाजूला लावून लघुशंकेसाठी गेला असता चोरट्यांनी त्याची बीएमडब्लू पळवल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी अमृतसरचे असलेले रिषभ अरोरा यांनी तक्रार दिली आहे. अरोरा हे शनिवारी रात्री उशीरा एका पार्टीनंतर घरी जात होेते. त्यावेळी त्यांनी लघुशंकेला जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. त्यानंतर मोटरसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी बंदूकीचा धाक दाखवून अरोरा यांची गाडी चोरली.

अरोरा नोएडाच्या पारस टेयरा सोसायटीत वास्तव्यास असून ते स्टॉक ब्रोकरचं काम करतात. चोरीला गेलेली कार अरोरा यांची स्वतःचीही नव्हती, ते गेल्या सात ते आठ दिवसांपासून मेव्हण्याची कार वापरत होते. तसेच त्या कारवर 40 लाख रुपायांचे अद्याप कर्ज असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रथमदर्शनी ही दरोड्याची घटना वाटत असून अरोरा यांच्या ओळखीच्या व्यक्तीचा यात सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

बीएमडब्लू शोधणे आणि चोरांना अटक करणे आमची प्राथमिकता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपास सुरू असून लवकरच गाडीचा आणि चोरांचाही शोध घेतला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.