उत्तर विदर्भ, मराठवाड्यात पुढील काही तासात गारपिटीचा इशारा; यवतमाळ, भंडारा, अकोल्यात गारांसह पाऊस

मुंबई : उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावरील चक्रीय चक्रवात विदर्भ व लगतच्या मध्य प्रदेशापर्यंत पसरला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून यवतमाळ, भंडारा, अकोल्यात पहाटेपासून गारपीटीसह हलक्या पावसाची सुरुवात झाली आहे. येत्या ३ ते ४ तासात उत्तर विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नागपूरच्या डॅल्पर रडारवर संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेशाच्या बहुतांश ठिकाणी ढग दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार गारपिट होऊ शकते.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात वादळी वार्‍यांसह गारपीट होण्याची शक्यता आहे.

१८ फेबुवारी रोजी मध्य महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.