विखे संपर्कात नाहीत – दानवे

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे यांचा अद्याप भारतीय जनता पक्षाशी कोणताही संपर्क झालेला नाही. भाजपाचा कोणताही नेता यांच्या संपर्कात नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

खासदार दानवे यांनी आज खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की , विखे हे आमच्या संपर्कात नव्हते. आम्हीही त्यांच्या संपर्कात नव्हतो. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दबाव तयार करण्यासाठी ते वेगवेगळ्या पक्षातील प्रवेशाबाबत चर्चा घडवून आणत आहेत.

विखे हे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांवर ते उमेदवारीसाठी दबावतंत्र आणत आहेत. माझी त्यांची भेटही नाही. त्यामुळे विखे पितापुत्रांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या बातम्या फक्त राजकीय चर्चाच आहे, असेही दानवे म्हणाले.