काहीही लिहून दिलेलं नाही, अशोक चव्हाणांच्या ‘मल्टी’स्टारर सिनेमात शिवसेनेच्या ‘वाघा’ची ‘एंट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्रा सारखच असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे, या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच अशोक चव्हाण यांनी शिवसेनेकडून लिहूनही घेतल्याचे सांगितले. त्यावर, शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंनी या विधानाचे खंडन केले आहे.

अशोक चव्हाण यांच्या विधानानंतर आमचा सिनेमा हा मल्टिस्टार सिनेमा असून तो यशस्वी होणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. आता या महाविकास आघाडीच्या सिनेमात शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची एंट्री झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेपूर्वी, संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असे न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली. याची पूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी त्यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाही. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे हे सरकार स्थापन झाल्याचे अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना सांगितले.

तसेच घटनाबाह्य काम करणार नाही असं शिवसेनेकडून लिहून घेतलं असून शिवसेनेने उद्देशाबाहेर काम केलं तर सत्तेतून बाहेर पडू असा थेट इशारा त्यांनी नांदेडमधील भाषणात बोलताना शिवसेनेला दिला. यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांचे लिखीत स्वरूपाच्या वक्तव्याचे खंडन केले. शिवसेनेने काँग्रेसला काहीही लिहून दिलेलं नाही असे शिंदे सांगितले. सरकार हे राज्यघटनेने सांगितलेल्या तत्वांप्रमाणेच काम करत असते. किमान समान कार्यक्रमाशिवाय काहीही लिहून देण्यात आलेलं नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.