‘सरपंच’ जनतेतून नाही तर ‘सदस्यांमधून’ निवडले जाणार : हसन मुश्रीफ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात लवकरच सरपंच पदाच्या निवडणूकांमध्ये बदल होणार आहेत. आता सरपंच जनतेतून नाही तर सदस्यांमधून निवडले जातील असे संकेत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

गेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत राज्यातील जनतेतून थेट ग्रामपंचातीचा सरपंच निवडला गेला. परंतू आता महाविकासआघाडीच्या सरकारने ठरवले आहे की सदस्यांमधून सरपंचांची निवड व्हावी. सरपंच पदासाठी जनतेतून निवडणूक होणार नाही, त्यासंबंधीत अध्यादेश लवकरच आणला जाईल अशी माहिती हसन मुश्रीफ यांच्याकडून देण्यात आली.

सोमवारी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी मुश्रीफ यांनी संवाद साधला. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, निलेश लंके, बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते.

हसन मुश्रीफ म्हणाले की जनतेमधून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आहेत. या सर्वांचा विकास कामावर परिणाम होतो. मुळात सरंपच व नगरपालिका अध्यक्ष यांची थेट निवड करण्याबाबतचा ठराव जेव्हा तत्कालीन ग्रामविकासमंत्र्यांनी मांडला होता, तेव्हाच त्याला मी विरोध केला होता. आताही जनतेतून होणारी थेट सरपंच निवडणूक रद्द करावी, अशी विधिमंडळाच्या अनेक सदस्यांची मागणी आहे.

पुढे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की कारण बऱ्याचवेळा एका विचाराचा सरपंच निवडून येतो व सदस्य वेगळ्या विचाराचे येतात. त्यामुळे विकास कामांवर त्याचे दुरोगामी परिणाम होतात. त्यामुळेच थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक न होता ती सदस्यांमधून व्हावी, यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला असे म्हणताना मुश्रीफ म्हणाले की शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देऊ असे जर भाजपकडून सांगण्यात आले होते. तर हा विषय (महाविकासआघाडी) झाला नसता. भाजपने विश्वासघात केला म्हणून सगळा घोटाळा झाला.

नगरजवळील लष्कारांच्या के. के. रेंज या युद्ध प्रशिक्षण व सराव क्षेत्राच्या विस्तारीकरणासंबंधित हलचाली सुरु आहेत. पंरतु राहुरी, नगर, पारनेर तालुक्यातील गावांमधून विस्तारीकरणाला विरोध आहे. एवढेच नाही तर मंत्री शंकरराव गडाख आणि प्राजक्त तनपुरे यांच्यासह पारनेर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा या विस्तारीकरणाला विरोध आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, के. के. रेंजच्या विस्तारीकरणाला शेतकऱ्यांचा असणारा विरोधी हा सरकारला याआधीच कळाला आहे. यासंबंधित आधिक माहिती घेतली जाईल.

फेसबुक पेज लाईक करा –