आता मायावतींवरही बायोपिक ; ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

मुंबई : वृत्तसंस्था – निवडणूकीचा प्रभाव आता बॉलीवूडवरही पडत आहे. विविध राजकीय नेत्यांवर बायोपिक बनत आहेत. डॉ. मनमोहन सिंह, बाळासाहेब ठाकरे, एनटी रामराव, नरेंद्र मोदी आणि जयललिता यांच्यासोबत आता माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या मुख्य मायावती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात येणार आहे.

दिग्दर्शक सुभाष कपूर या बायोपिकचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर मायावतींच्या भूमिकेत विद्या बालन झळकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अद्याप कुणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. विद्या बालन सध्या एका वेबसिरीज मध्ये काम करत असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय विद्या बालन सध्या ‘एनटीआर’ या एन. टी. रामराव यांच्या जीवनावर आधारित तेलगु बायोपिकमध्ये काम करत असून यात ती एनटीआर यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

भारतीय राजकारणात सक्षम नेत्या म्हणून मायावती यांची ओळख आहे. मायावती यांनी आतापर्यंत चारवेळा उत्तरप्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे.

कंगना रनौत दिसणार आता जयललिता भूमिकेत –

सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. त्यामध्ये आता जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची भर पडणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय यांनी जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जयललिता यांच्या जिवनातील चढउतार, त्यांची राजकीय कारकिर्द या साऱ्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. जयललिता यांचा बायोपिक हिंदी, तामिळ या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये या चित्रपटाचं नाव ‘जया’ असं असेल तर तामिळमध्ये ‘थलाइवी’ असं असणार आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री कंगना रनौत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे