राज्यातील महाविकास आघाडीत तीव्र मतभेद ! 1 मे पासून राज्यात NPR लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये तणाव वाढताना दिसून येत आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेच्या प्रकरणात यू टर्न घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे दुर्लक्ष करत एनपीआरवर काम सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त एका हिंदी न्यूज चॅनलने दिले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात 1 मे पासून एनपीआर सुरु करायचा आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या कायद्याला उघडपणे विरोध केला आहे. काँग्रेसने एनआरपीला एनआरसीचा चेहरा असल्याचे म्हणत असताना राष्ट्रवादीने देखील यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या सरकारमध्ये यावरून तणाव निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद असल्याचे हे पहिल्यांदाच घडले असे नाही. यापूर्वी देखील त्यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएला देण्यास विरोध केला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयकडे सोपवला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये दोन भिन्न मत प्रवाह असल्याचे दिसून येत आहे.