धक्कादायक : एअर स्ट्राइकवेळी बालाकोटमध्ये ३०० मोबाईल कनेक्शन होते ‘ॲक्टीव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ बॉम्बहल्ला करत उद्ध्वस्त केला. या कारवाईवेळी बालाकोटमध्ये ३०० मोबाईल कनेक्शन्स ॲक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे . एएनआय’ वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

दहशतवादी मारल्याच्या दाव्याला बळ –

२६ फेब्रुवारीला मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२००० विमानांनी बालाकोटवर बॉम्बहल्ला केला. हवाई दलाच्या वैमानिकांनी जवळपास १००० किलोंचे बॉम्ब फेकले. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ज्या तळावर हल्ला केला, तिथे हल्ला करण्यापूर्वी ३०० मोबाईल कार्यरत होते, अशी माहिती राष्ट्रीय तंत्र संशोधन संस्था म्हणजेच एनटीआरओकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला करण्यापूर्वी एनटीआरओकडून याची खात्री करण्यात आली आणि त्यानंतरच हल्ल्याला परवानगी देण्यात आली होती. एअर स्ट्राइकच्यावेळी जवळपास ३०० मोबाईल अ‍ॅक्टिव्ह असल्यानं तिथे किती दहशतवादी असतील, याचा अंदाज लावता येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.त्यामुळे दहशतवादी मारल्याच्या दाव्याला बळ मिळालं आहे.

एअर स्ट्राईकवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भारताच्या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले याचे पुरावे सरकारने द्यावेत, अशी मागणी विरोधकांची आहे. त्या पार्श्वभूमीवर एनटीआरओचं उत्तर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.