Pune : काम सांगितल्याच्या कारणावरून चिडलेल्या तरुणाने सहकार्‍यावर चाकू हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑफिसमधील एका सहका-याने काम सांगतिल्याचा राग आल्याने चिडलेल्या तरुणाने त्याच्यावर चाकूने वार केला. यात संबंधित तरुण जखमी झाला आहे. कोंढव्यातील सिस्टम फायनान्समध्ये शुक्रवारी (दि. 20) ही घटना घडली आहे.
महंमद मुस्तफा रियाज कुरेशी (24, रा. वानवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विघ्नेश चव्हाण (20, रा. बिबवेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश आणि महंमद कोंढव्यातील सिस्टम फायनान्समध्ये काम करतात. दोघेही शुक्रवारी ऑफिसमध्ये असताना महंमदने विघ्नेशला एक काम सांगितले. त्याचा राग आल्याने विघ्नेशने महंमदला शिवीगाळ करून त्याच्यावर चाकूने वार केले. या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.