मालेगाव स्फोटातील आणखी एक आरोपी शहिद करकरेंविषयी बरळला ; वाद चिघळण्याची शक्यता

वृत्तसंस्था – मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने २६/११ च्या हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर याच प्रकरणातील आणखी एक आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्यायनेही त्यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे याप्रकरणी पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

हेमंत करकरे यांचा विनाश माझ्या शापामुळे झाला. असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं होतं. त्यानंतर आता याच प्रकरणातील आरोपी निवृत्त मेजर उपाध्याय यांनीही बेताल वक्तव्य केलं आहे. मेजर उपाध्याय यांनी शुक्रवारी उत्तरप्रदेशातील बलिया येथून अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांनी या सर्व प्रकरणाला तत्कालीन युपीए सरकारला जबाबदार धरले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल, पी.चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, या नेत्यांमुळे आमच्यावर कारवाई झाली असं उपाध्याय यांचं म्हणणं आहे.

काय म्हणाले उपाध्याय

अतिरेक्यांच्या हातून हेमंत करकरे मारले जाणे हा त्यांच्या नालायकपणाचा पुरावा आहे. कोणताही पोलीस अधिकारी मरण पावला तर त्याला शहिद म्हटले जात नाही. शहिद केवळ स्वातंत्र्य सैनिक, आणि सैनिक असतात. पोलीस अधिकारी कधीही शहिद नसतो. हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह हिला निर्वस्त्र करून मारले होते. आम्हाला टॉर्चर केले गेले. याप्रकऱणात १२ पैकी ११ जण नीट चालूही शकत नव्हते. प्रज्ञा ठाकूर तर व्हिलचेअरवर होत्या. हेमंत करकरे यांनी त्यांना टॉर्चर केले त्याचा हा पुरावा आहे.