मुंबई विमानतळावर एअर फोर्सचे विमान घसरले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई विमानतळावर रात्री एक मोठी दुर्घटना होता होता टळली. एअरफोर्सचे विमान विमानतळावरुन उड्डाण घेत असताना ते धावपट्टी सोडून पुढे गेले. त्यामुळे विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. तातडीने इमर्जन्सी सुविधा त्या धावपट्टीवर पोहचल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी घडली.

एअरफोर्सचे हे विमान बंगलुरु येथील एलंगा एअरफोर्स तळावर जात होते. मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी नंबर २७ वरुन एअरफोर्सचे हे विमान उड्डाण घेत होते. मात्र, धावपट्टी संपायला आली तरी त्याने आकाशात उड्डाण घेतले नाही. त्यामुळे विमानतळ नियंत्रण कक्षात एकच धांदल उडाली. मात्र, धावपट्टीपासून पुढे जाऊन ते विमान थांबले. त्यात कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर काही काळ ही धावपट्टी बंद करण्यात आली होती. विमानतळ अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा देत सांगितले की, एक विमान धावपट्टी सोडून पुढे गेले होते. ही घटना रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी घडली असून त्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगितले.