सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा येथे पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्याजवळ सापडला गांजा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा येथे पोलिसांनी अडवताच एका दुचाकीचालकाने आरडाओरडा करीत बॅरिगेटवर डोके आपटून घेतले. त्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालून डोक्यात दगड मारून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या खिशातून गांजाची पुडी खाली पडल्यानंतर तातडीने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी नेण्यात आले, असे हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.

महंमद प्यारे शेख (वय 22, रा. कोंढवा) असे गांजा सापडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.
कोळी म्हणाले की, मांजरी फाटा चौक येथे हडपसर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी वाहनांच्या गर्दीतून एक दुचाकीचालक भरधाव जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला अडविले.

त्यावेळी त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच अंगाशी झटापट करीत वाद घालू लागला. पोलिसांशी झटापट करताच त्याच्या खिशातून गांजाची पुडी खाली पडली. दरम्यान, रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे त्याला तातडीने पुढील कारवाईसाठी हडपसर पोलीस स्टेशनला पाठविण्यात आल्याचे कोळी यांनी सांगितले.