बनावट नोट चलनात आणताना तरुण गजाआड

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय चलनातील २ हजार रुपयांची बनावट नोट चलनात आणताना नागरिकांनी एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर त्याचा साथिदार पळून जाण्यात यशस्वी झाला. हा प्रकार आज सकाळी दौड शहरातील शालिमार चौकातील एका किरणा मालाच्या दुकानात घडला. व्यापाऱ्याच्या दक्षतेमुळे आरोपीला अटक करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोहनसिंग जितेंद्रसिंग (वय २०, रा. कथैला, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक असिफ शेख यांनी दौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहराच्या शालिमार चौकातील किराणा व्यापारी भरत लढ्ढा यांच्याकडे रोहनसिंग व त्याचा एक अज्ञात साथीदार आज सकाळी किराणा खरेदी करून दोन हजार रुपयांची बनावट नोट वटविण्यासाठी आला होता.  परंतु भरत लढ्ढा यांना संशय आल्याने त्यांनी त्यास शेजारील लोकांच्या साह्याने पकडून ठेवल्याने त्याचा साथीदार पळून गेला.

दौंड पोलिसांनी रोहनसिंग यास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र अथवा मोबाईल संच आढळून आलेले नाही. याबाबत पोलिस नाईक असिफ शेख यांनी फिर्याद दिली आहे. चाकण येथून बुधवारी (ता. २) स्वारगेट येथून बसने रोहनसिंग व त्याचा साथीदार दौंड शहरातील नगर मोरी येथे उतरले होते, अशी माहिती पुढे आली आहे.