पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाला लाखोंचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान मुद्रा योजनेत १७ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका तरुणाला १ लाख २२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

याप्रकरणी अतुलकुमार अरुणकुमार त्रिपाठी (वय. २८, रा. शनिवार पेठ ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जानवी कुमार, सुनील कुमार, प्रियंका भारद्वाज, दिलशाद अली यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुलकुमार यांना मोबाईलवर फोन करून आणि इमेलद्वारे पंतप्रधान मुद्रा योजनेतून १७ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर चौघांनी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे भरण्यास सांगितले. त्यांना वेगवेगळ्या बँकांचे खाते क्रमांक दिले.

त्यानंतर त्यांनी या खात्यांवर १ लाख २२ हजार रुपये वेळोवेळी भरले. त्यानंतर संबंधितांनी त्यांना कर्ज न देता त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी यासंदर्भात तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलगुटकर करत आहेत.