शरद पवारांच्या निर्कटवर्तीय माजी आमदाराचे ‘कोरोना’मुळे निधन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची लागण झाल्यामुळे सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार युनूस शेख यांचं रविवारी (दि.14) सकाळी निधन झालं. युनूस शेख यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. या घटनेने सोलापूरसह राज्यात खळबळ उडाली आहे.

यूनूस भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते. त्यांनी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना सोलापूरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यात रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास युनूस शेख यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती माजी महापौर मनोहर सपाटे यांनी दिली आहे.

1969, 1975, 1985 साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1992 साली ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. मात्र, 1998 मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.