लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी दीनदुबळ्या घटकांचा विचार करायलाच हवा होता : शिवसेनेची पुन्हा टीका

पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याआधी केंद्र सरकारने सर्वसामान्य दीनदुबळ्या घटकांचा विचार करायला हवा होता अशी टीका शिवसेनेकडून सामना संपादकीयमधून करण्यात आली आहे. औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरुन नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आलेला असून सरकारने विचार करायलाच हवा होता.

औरंगाबाद-जालना रेल्वे रुळावरील छिन्नविच्छिन्न मृतदेह पाहून त्या नागरिकांनी भाकरीसाठी स्वत:चे गाव सोडले होते. ती भाकरीच लॉकडाउनने हिरावून घेतली. त्याच भाकरीच्या शोधात ते रेल्वे रुळावरून चालत निघाले. घरी पोहोचलेच नाहीत व त्यांच्या मृतदेहांच्या बाजूला प्रवासासाठी बांधून घेतलेल्या भाकर्‍याच विखुरलेल्या दिसल्या आहेत. अशा भाकरीचे बळी हेसुद्धा कोरोना आणि लॉकडाउनचेच बळी आहेत. हे बळी कधी थांबणार अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. औरंगाबाद रेल्वे रुळांवर 16 स्थलांतरित मजूर मालगाडीखाली अक्षरश: चिरडले आहेत.

या मजुरांना करोना संक्रमणाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांना थंडी भरून ताप आला नाही. त्यांना सर्दी-खोकला नव्हता. त्यांना श्वास घेण्यास अडथळे नव्हते. त्यांची प्रकृती चांगली होती तरीही ते कोरोनाचे बळी आहेत व त्यांच्या मृत्यूची जबाबदारी शेवटी शासनावरच आहे. रोटीसाठी त्यांनी हा प्रवास सुरू केला, त्या भाकर्‍या संपूर्ण रेल्वे रुळावर विखुरल्याचे चित्रा मन हेलावणारे आहे. तितकेच वास्तवाची भीषणता दाखवणारे आहे.

कोरोनामुळे जनतेच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून लॉकडाउन केले. पण मजूरवर्ग लॉकडाउनमध्ये एक तर उपासमारीने मरत आहे, नाहीतर अशा पायदळ प्रवासात चिरडून किंवा दमून मरत आहे. हेसुद्धा कोरोनाचे आणि लॉक डाऊनचे बळी आहेत. रोजच्या रोज नव्या कोरोनाग्रस्तांचे आणि त्यातल्या मृतांचे आकडे प्रसिद्ध होत असतात. त्यात या 16 जणांचा समावेश अपघाती नव्हे तर कोरोनाचेच बळी म्हणून करायला हवा असे शिवसेनेने म्हटले आहे.