…अन्यथा मातोश्री किंवा वर्षावर आम्हाला आश्रय घ्यावा लागेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आगीत नुकसान झाल्याने आमची इमारत राहण्यायोग्य नाही, असे मुंबई महापालिकेचे व राज्य सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे पर्यायी घरे देऊन आमचे पुनर्वसन करावे. अन्यथा आम्हाला मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आश्रय घेण्यावाचून पर्याय उरणार नाही. नाईलाजास्तव ते पाऊल उचलावे लागेल, असा इशारा अग्निकांडातील क्रिस्टल टॉवरमधील रहिवाशांनी दिला आहे. इमारतीतील सर्व पीडित रहिवाशांची तुलसी मानस शाळेत बैठक झाली. त्यात ही भूमिका ठरवण्यात आली. रहिवाशांचे वकील अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी ही माहिती दिली.

[amazon_link asins=’B075CDNVLM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb12416a-a759-11e8-a7a7-5f722fe9a121′]

अ‍ॅड. सदावर्ते यांनी सांगितले की, आगीच्या घटनेनंतर आग पूर्णपणे विझल्याची खात्री करून अग्निशमन दलाने रहिवाशांना आत प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यानंतर रहिवाशांनी आपापल्या घरांत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्याचवेळी महापालिकेने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे आता या इमारतीत रहायचे कसे, हा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे. यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन इमारतीजवळच असलेल्या तुलसी मानस शाळेत बैठक घेतली. त्यात महापालिकेची संभाव्य कारवाई, न्यायालयातील प्रलंबित वाद इत्यादी मुद्यांवर चर्चा झाली.

शहरातील एखादी इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली की त्या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढून त्यांना शहरातच तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी घरे दिली जातात. आमची इमारत राहण्यायोग्य नसल्याचे ठरवून वीजपुरवठा बंदच ठेवण्यात आला, तर पालिका किंवा म्हाडाने आमचे नियमाप्रमाणे पुनर्वसन करून द्यावे. अन्यथा आम्हाला मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आश्रय घ्यावा लागेल, असा इशारा या बैठकीत रहिवाशांनी दिला आहे.

आगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेने या इमारतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे. इमारतीमधील वायरिंगची यंत्रणा सुस्थितीत केल्यास पुन्हा वीजपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन वीज कंपनीने दिले आहे. त्यामुळे बहुतेक रहिवाशांनी बॅटरी व इन्व्हर्टर खरेदी केले. आता इमारतीमध्ये वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत बॅटरी व इन्व्हर्टरवरच वापरावे लागणार आहेत.

क्रिस्टल टॉवरला बुधवारी लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला; तर २३ जण जखमी झाले. या जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील १४ जणांना गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. नऊ रुग्णांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे.