घोषणेपैकी केवळ 1 लाख 86 हजार 650 कोटी कामाचे; काँग्रेसचा PM मोदींवर ‘हल्लाबोल’

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोना संकटावर मात करण्यासाठी मोदी सरकारने तब्बल 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्रा, काँग्रेसने हे पॅकेज फसवे असून प्रत्यक्षात केवळ जीडीपीच्या 0.91 टक्केच असल्याचा दावा केला आहे. मोदी सरकारच्या 20 लाख कोटींच्या पॅकेजवर आज काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला.

मोदींनी 20 लाख कोटींची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात केवळ 1 लाख 86 हजार 650 कोटी रुपयांचे पॅकेज आहे. हे पॅकेज सरकारी दाव्यानुसार जीडीपीच्या दहा टक्के नाही तर केवळ 0.91 टक्के आहे, अशी जोरदार टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. सरकारकडून प्रत्यक्ष मदत कमी आणि केवळ कर्जे आणि जुन्याच योजनांची पुनरावृत्ती कशी आहे याची माहिती दिली. केंद्र सरकारचे यावर्षीचे बजेट 30 लाख कोटी रुपयांचे होते.

या बजेटच्या पलीकडे ज्या घोषणा आहेत त्याच केवळ आर्थिक मदत म्हणून गृहीत धरल्या जाऊ शकतात. यात ज्या मोजक्या गोष्टी पात्र ठरतात त्याची यादी चिदंबरम यांनी दिली. ही बेरीज केवळ अवघी 1 लाख 86 हजार कोटी असल्याचाही दावा केला. या पॅकेजमध्ये तळागाळातले गरीब, स्थलांतरित मजूर, भूमीहीन शेतकरी, कामधंदा गमवावे लागलेले कर्मचारी यासारख्या अनेक घटकांच्या हाती काहीच लागलं नसल्याचाही आरोप चिदंबरम यांनी केला आहे. कोरोना संकटात नागरिकांना खरीखुरी मदत करायची असेल तर किमान 10 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज तयार करावे अशीही मागणी चिदंबरम यांनी केली.