शरद पवारांकडे UPA चं नेतृत्व ?, पी चिदंबरम यांचं महत्त्वाचं विधान

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्राने नव्याने केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेतले जावेत, या मागणीवर शेतकरी अजूनही ठाम आहेत. दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर होते. तसंच पवार यांनी यूपीएतील विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. दिल्लीत शरद पवार हे केंद्रस्थानी असतानाच पवारांकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच यूपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी यावर भाष्य केलं आहे. पी चिदंबरम यांनी शरद पवार यांची यूपीए अध्यक्ष होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची यूपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं अशी इच्छा नसावी असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. “शरद पवार यांचीही यूपीए अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची घोषणा किंवा निवड व्हावी अशी इच्छा नसेल. जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. आम्ही पंतप्रधानांची निवड नाही करत आहोत” असं देखील पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला संजय राऊत यांच्याकडून जोरदार बॅटिंग सुरू असताना आता खुद्द शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे. ‘यूपीएचा अध्यक्ष होण्यात मला कोणताही रस नाही. माझ्या नावावरून अनावश्यक वाद निर्माण केला जाऊ नये. मी यूपीएचं अध्यक्ष व्हावं, हे शिवसेनेचं मत आहे. माझं नाही,’ असं पवार म्हणाले.गेल्या आठवड्यात राऊत यांनी दोनदा त्यांच्या लेखांमधून पवारांनी यूपीएचं नेतृत्त्व करावं असं मत व्यक्त केलं. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आणि मजबुतीसाठी पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व सोपवण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यावरून काँग्रेसनं नाराजीदेखील व्यक्त केली. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी करावं यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.

विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही

यूपीएचं नेतृत्त्व कमकुवत झालं आहे. सत्ताधाऱ्यांना तोंड देताना विरोधी पक्षांमध्ये एकजूट दिसत नाही. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए एक राजकीय आघाडी आहे. मात्र आता तिची अवस्था एका एनजीओसारखी झाली आहे. काँग्रेसला वर्षभराहून अधिक काळ पूर्ण अध्यक्ष नाही, अशा शब्दांत राऊत यांनी अग्रलेखातून काँग्रेसच्या अवस्थेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. शनिवारी ‘सामना’च्या अग्रलेखातून यूपीएच्या अवस्थेवर हे भाष्य करण्यात आलं.