भारतात हल्ले घडवून आणण्याचा पाकचा नवा डाव, खळबळजनक माहिती उघड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने आता नवी चाल खेळली आहे. भारतीय सैन्य व गुप्तचर संस्थांच्या सर्तकतेमुळे पाकिस्तान, आयएसआय व दहशतवादी संघटनांना आपल्या करण्यात अपयश येत आहे. यामुळे आता आयएसआय व दहशतवादी संघटनांनी भारतातील गुन्हेगारी जगताचा यासाठी वापर करणे सुरु केले आहे. देशात दहशतवादी करवाया घडवण्यासाठी आता स्थानिक गँगस्टर्सवर जबाबदारी सोपवली जात असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक गुंड आणि गँगस्टरर्स यांचं स्थानिक पातळीवर नेटवर्क असतं. त्या नेटवर्कचा उपयोग करुन घातपात घडविण्याची ही योजना आहे. पंजाबमध्ये यासंबंधातल्या काही घटना उघडकीस आल्याने गुप्तचर विभागाचे सर्वच स्तरावर याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. यातले अनेक गँगस्टर्स हे फरार आहेत किंवा काही जेलमध्ये आहेत. त्या सगळ्यांशी संपर्क स्थापन करण्याचं काम दहशतवादी करत असून त्यांची मदत घेत घातपात घडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुंडांना पैशांचं अमिश दाखवून त्यांच्या कडून हे काम करुन घेण्याची शक्यता आहे.

ISI चा दहशतवादी अटकेत

राजधानी दिल्लीतल्या धौलकुआं भागातून अटक करण्यात आलेल्या आयएसआयच्या दहशतवादाच्या घरात स्फोटकांचा साठा सापडला आहे. या स्फोटकांचा वापर करुन दिल्ली हदरविण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी दहशतवादी अबू युसूफ याला अटक केली आहे. तो मुळचा बलरामपूरचा आहे. पोलिसांनी त्याच्या घरी छापेमारी केली. त्यावेळी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. तो मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होता. हे हल्ले करण्यासाठी त्याने दोन प्रेशर कुकरही आणले होते. यामध्ये 5 किलो स्फोटक भरून त्याचा बॉम्ब करण्यात आला होता. त्याला टायमरही लावण्यात आले होते. त्यामुळे हा कट मोठा होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.