चीनच्या विरोधात भारताने जे केले, पाकिस्तान सुद्धा तेच करण्याच्या तयारीत

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारताने काही दिवसांपूर्वी टिक-टॉकसह 59 चीनी अ‍ॅपवर बॅन लावला होता. पाकिस्तान सुद्धा आता चीनी अ‍ॅप्सबाबत कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए) ने सोमवारी चीनी कंपनीचा मोबाइल व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिक-टॉकला अखेरचा इशारा दिला आहे. याशिवाय, पाकिस्तानने अश्लिल कंटेन्ट आणि नकारात्मक परिणामांच्या तक्रारींवरून लाईव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅप बीगो ब्लॉक केले आहे.

सोमवारी जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये पीटीएने म्हटले आहे की, सोशल मीडिया अ‍ॅप्स विशेषकरून टिक-टॉक आणि बीगोवर अश्लिल साहित्य येत असल्याच्या असंख्या तक्रारी आल्या आहेत.

पाकिस्तानच्या टेलिकॉम नियामक संस्थेने म्हटले, या अ‍ॅपचा समाजावर खुप नकारात्मक परिणाम होत आहे, विशेषकरून तरूणांवर याचा सर्वात जास्त वाईट परिणाम होत आहे.

पीटीएने देशातील कायद्यानुसार नैतिक आणि कायद्याच्या चौकटीत राहून कंटेन्ट प्रकाशित करण्याबाबत या कंपन्यांना नोटिस जारी केली आहे. आतापर्यंत या कंपन्यांचे उत्तर समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे, असे पीटीएने म्हटले आहे.

प्रिव्हेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम्स अ‍ॅक्ट (पीईसीए), 2016 अंतर्गत पाकिस्तानने बीगोला ब्लॉक केले आहे, तर टिक-टॉकला आपल्या प्लॅटफॉर्मवर अश्लिलता आणि अनैतिकता नियंत्रित करण्याबाबत शेवटचा इशारा दिला आहे.

यापूर्वी, पीटीएने ऑनलाइन बॅटल गेम पबजीवर अस्थायी बॅन लावला होता. पबजीचे अ‍ॅडिक्शन आणि लोकांच्या आरोग्यावर होणारा वाईट परिणाम पाहून हा बॅन लावला होता.

पीटीएकडे पबजीविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. ज्यामध्ये म्हटले होते की, हा खेळ लोकांना अ‍ॅडिक्टिव्ह बनवण्यासोबतच शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करत आहे. यामुळे लोकांचा वेळदेखील वाया जात आहे. पबजी बॅन करण्याचा निर्णय सुद्धा, तक्रारी आल्यानंतर घेण्यात आला. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सुद्धा दावा करण्यात येत आहे की, पबजीमुळे लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत.